समन्वयातून समग्रतेकडे (मराठी)

समन्वयातून समग्रतेकडे (मराठी)

पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात प्रकाशित झालेल्या माझ्या 'समन्वयातून समग्रतेकडे' या पुस्तकाविषयी थोडेसे.. सगळीच गणिते नाहीत बरोबर येत. काही चुकतात, काही सुटतात. काही गणिते आपण सोडवतो पण उत्तरापर्यंत पोहचू शकत नाही. अशी गणिते मग अपुरी राहतात. पण या साऱ्या प्रक्रियेमध्ये आयुष्य मात्र थांबत नाही. ते सरकत राहते. घड्याळाच्या काट्यांबरोबर पुढे पुढे पोहचत जाते. कधी खाचखळगे, तर कधी अगदी सुरेख पक्का राजमार्ग. आयुष्याच्या या प्रवासात रस्त्यांचे आकार, पद्धती, प्रकार सारे काही बदलत जाते. स्थिर राहतो तो त्यांच्यामध्ये होणारा नकळत पण अनिवार्यता असणारा बदल. त्याला आपण कसे सामोरे जातो यावरच जीवनाची खरी गुणवत्ता अवलंबून असते. या बदलाला सक्षमपणे व यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी आपण समग्र आहोत याची अनुभूती वेळीच झाली पाहिजे. ही अनुभूती समन्वय साधल्याशिवाय साधता येत नाही. म्हणूनच 'समग्रता' हे साध्य असते आणि 'समन्वय' हे साधन. हे साधन कसे, कुठे आणि किती वापरायचे हे आपल्याला समजावे, उमजावे व यातून आपण सर्वांनी आपल्या सर्वांमध्येच नैसर्गिकरित्या आस्तित्वात असनाऱ्या समग्रतेकडे वाटचाल करावी हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. हीच या विचार यज्ञाची सार्थकता आहे. समन्वयातून समग्रतेकडे...खरे तर हा पुस्तकात मावणारा विषय नाही. याला मुळात शब्दात पकडणेच अवघड, कारण शब्दांना आपली मर्यादा असते. पण तरीदेखील आजच्या धकधकीच्या जीवनात जगत असताना निर्माण होणाऱ्या कोलाहलचा, संभ्रमाचा अडथळा पार करून अधिक अर्थपूर्ण व सुंदर आयुष्य कसे जगता येईल यावर झालेल्या चिंतनाचे प्रकटीकरण म्हणजे हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये 'उभा समन्वय' (Vertical Co-ordination) आणि आडवा समन्वय (Horizontal Coordination) अशा काही मुलभुत सकल्पना मांडल्या आहेत. जीवनामध्ये आवश्यक असणारा हा समन्वय कसा साधायचा? या समन्वयातून जीवन समग्र कशा प्रकारे बनू शकेल? व या संपूर्ण प्रक्रियेमध्ये येणाऱ्या समस्यांना सामोरे कसे जायचे यांसारख्या अतिशय महत्वपूर्ण प्रश्नांचा धांडोळा म्हणजे हे पुस्तक आहे. सावित्रबाईं फुले पुणे विद्यापीठातील तत्वज्ञान विभागाचे विभागप्रमुख व विख्यात तत्वचितक प्रा.डॉ.रवींद्र मुळे याची अतिशय वाचनीय व चिंतनपर प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे. तसेच पुण्यातील एसएनडीटी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मानसी राजहंस यांचा शुभेच्छा संदेश व रामकृष्ण मठ, पुणे यांचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद यांचा आशीर्वाद संदेश या पुस्तकास लाभले आहेत. पुण्यातील नावीन्य प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. आपल्या जीवनामध्ये नैसर्गिकरित्या अस्तित्वात असणाऱ्या समन्वयाची अनुभूती घडवण्यास हे पुस्तक आपणास नक्की मदत करू शकेल जेणेकरून आपण समग्र होऊ शकू आणि ही समग्रताच आपले जीवन परिपूर्ण बनवेल. पुस्तक नक्की वाचा. धन्यवाद. पुस्तकाबद्दल माझ्याशी प्रा. विजयकुमार भवारी यांनी साधलेला संवाद युट्यूबवर खालील लिंक वर उपलब्ध आहे. https://youtu.be/baLEI5FmCng पुस्तक खालील लिंक वर उपलब्ध आहे. https://www.bookganga.com/R/885CS




Comments

Popular posts from this blog